वाट...

          आजही मी पुन्हा तिथे गेले होते... त्या समुद्र किनाऱ्यावर... तुझ्या परतीच्या आशेने.. मला वाट पाहत उभी असलेली बघून तू नेहमीसारखाच येशील अशी अपेक्षा मनात ठेवून... त्या घोंघावणार्या वाऱ्यात बटा सावरत एकटीच उभी होते मी... पण!! तुझी चाहुलही नव्हती अरे!!!

           आज लाटांना स्पर्श करणं टाळलं मी... त्यांचं अलगद स्पर्शून जाणं तुझ्या अनाहूत, नकळत तरीही हव्याश्या स्पर्शासारखा भासलं... त्या सोनेरी वाळूच सरकुन जाणं सरून गेलेल्या त्या वेळेसारखं जाणवलं... मावळतीचा सूर्य बघणं टाळलं मी आज , तू माझी साथ सोडल्याचा तो क्षण पुन्हा अनुभवायचा नव्हता म्हणून... या लाटा आणि किनाऱ्यासारखं नातं आहे आपलं असं म्हणायचास तू... खरंच होतं रे ते... कधीही एकत्र न येणारं...
  
           खरं सांगू... तो विस्तीर्ण समुद्र पाहण्यासाठी नव्हतेच गेले मी... त्या काठ नसणाऱ्या अथांग क्षितिजाला पाहण्यासाठी गेले होते... आठवत होतं कोणीतरी, कधीतरी बोलून गेलेलं... देवाचं घर क्षितीजाच्या काठावर असतं असंच काहीसं...
   
           तुही गेलायस ना तिथे... माझी साथ सोडून... वाटलं होतं मला किनाऱ्यावर उभी असलेली पाहून तू नक्की येशील... पण.. नाहीच... कदाचित त्या क्षितिजाचे दरवाजे लवकर बंद होत असावेत...
  
         मीही आता मनाचे दरवाजे बंद करून घेतलेत... त्या देवाच्या घराच्या दरवाज्यांसारखेच...

                           @shivadnya

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Relationship check!

Last call....

आभाळमाया