आभाळमाया

             माणसाला नेहमी आभाळच व्हायचं असतं... अपवाद असतील काही जण नक्कीच! पण आभाळाला गाठण्याचं अप्रूप असतंच प्रत्येकाला... अगदी उंचीची भीती असणारा सुद्धा सांगतो अभिमानाने, एक दिवस आभाळाला हात टेकतील माझे. पण नाही होत असं कधी... शाब्दिक झाल्यासारखं होईल खरं हे, पण खरंच आभाळाला शिवता येईल का ओ? 
         जन्माला आल्यावर नाही न शिकवत कोणी ढग कापसाचे नाही वाफेचे असतात बाळ...  तोपर्यंत देवघरातला कापूसच आईने नेऊन ठेवलाय तिथे आपल्यासाठी असंच वाटतं! आईवरून आठवलं, माझ्या आईचं आणि ढगांचं फार जवळचं नातं आहे अगदी.. श्यामच्या आईसारखं तुझे पूर्वज त्या चांदण्यांत आहेत, आभाळातून तुझ्याकडे बघतायत असं कधीच सांगितलं नाही तिने... पण ती सूर्य मावळताना हातातली सगळी कामं सोडून कित्येक क्षण तशीच आभाळाकडे बघत बसून राही, ढगांचा प्रवास पाहत...
       आभाळ गाठण्याची भाषा करणाऱ्या प्रत्येकाला ती सांगे अरे, आभाळातले ढग असे दुरूनच पहावेत त्याला कशाला हात लावायला हवा... तुला दिलीय की देवाने जमीन ढग बघायला..  माणसाचं घर जमिनीवर आहे आणि देवाचं आभाळात...!आपण आपल्या घरातून दुसऱ्याचं घर बघावं...त्याच्या घरी कशाला जायचं!  मला फार हसू येई.. आभाळ हातात घेण्याची स्वप्नं बघणाऱ्यांनाही! असो!
           सूर्य मावळताना गोळा होणारे ढग पाहिलेत कधी?निसर्ग सगळ्यात सुंदर चित्र रोज काढत असेल तर ते हे! एका संध्याकाळी त्या तिथपर्यंत प्रवास करेन असं म्हणाले मी आईला सात वर्षांची असताना...! ती काहीच बोलली नाही... डोक्यावरून हात फिरवत तशीच वर बघत राहिली...
           आता कित्येक वर्ष उलटून गेलीत. प्रवास अजूनही करायचाय, पण फरक इतकाच आहे की आता मला त्या तिथपर्यंत जायचंय हे आईला सांगता येत नाही... नाही ओ! जनरेशन गॅप वगैरे काही नाही. त्याचं काय आहे माझ्याआधी तीच गेलीय प्रवासाला... आभाळाच्या! कधीतरी ढगांच्या आकारांत तिचाच चेहरा दिसतो मला... हात पसरून आभाळमाया करताना.!!!
              
                                   @shivadnya

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Relationship check!

Last call....